जाणून घ्या उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचे फायदे !

Effect of eating watermelon on human health

उन्हाळ्यात कापून ठेवलेल्या लालगर्द कलिंगडाचे दर्शनसुद्धा मनमोहक वाटते व बघताक्षणी आपल्याला कलिंगड खाण्याचे आकर्षण निर्माण होते, ते त्याच्या शीतल गुणामुळेच. जणू काही कलिंगड आपल्याला सांगते, “माझे सेवन करा,मग बघा उन्हाळा कसा सुसह्य होतो ते!”.अंगाची लाही लाही करणारा या उन्हाळ्यामध्ये ना काही करावेसे वाटत ना काही खावेसे वाटत. अशा परिस्थितीमध्ये शरीराला थंडावा देऊन अगदी शरीराच्या आतपर्यंत शरीरकोषांमधलीही उष्णता कमी करण्यास उपयोगी पडणारे फळ म्हणजे कलिंगड.

प्रत्यक्षातही या भयंकर उष्म्याच्या दिवसांमध्ये कलिंगड खाल्ले की शरीराला चांगलाच गारवा मिळतो. महत्त्वाचे म्हणजे तो गारवा एसीसारखा त्वचेला गार करणारा नसतो, तर रक्तालाही थंड करतो. त्यात तुम्ही जर कलिंगडाचा रस पिणार असाल तर तो म्हणजे शरीरामध्ये सोडलेला एसीच जणू! उन्हाळ्यात होणारा गरम लघवीचा त्रास, अंगावर उठणार्‍या उष्णतेच्या पुटकुळ्या, वगैरे तक्रारींवर हा कलिंगडाचा रस औषधाप्रमाणे उपयुक्त सिद्ध होतो.

शिवाय कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम हे खनिज असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य करते. तसेच कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचे एक बायोफ़्लेनेवॉईड असते. लायकोपेन हे एक अतिशय उत्तम ॲन्टिऑक्सिडन्ट आहे, जे रक्तामध्ये वाढलेल्या घातक फ्री-रॅडिकल्सना कमी करुन कॅन्सरचा धोका कमी करते. ज्यांच्या शरीरामध्ये लायकोपेनचे प्रमाण व्यवस्थित असते, अशा स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो, असे सुप्रसिद्ध हार्वर्ड संस्थेच्या संशोधकांचे मत आहे. तेव्हा उन्हाळ्याचा ताप कमी करण्यासाठी म्हणून कलिंगडाचे सेवन करा आणि घातक आजारांपासूनसुद्धा स्वतःला वाचवा.

Loading...

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here