डॉक्टरांपासून दूर राहण्यासाठी हे करा ..

Do This and Stay Away From Doctors

दैनंदिन आहारात कॅल्शियम, लोह यांसारखे घटक महत्त्वाचे असतात. हिमोग्लोबीन व विविध जीवनसत्त्वांची पातळी शरीरात योग्य राखली गेली, तर डॉक्टरांपासून दूर राहता येईल.तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि डॉक्टरपासून दूर राहायचं असेल, तर शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅल्शियम आणि लोहाची शरीराला आवश्यकता असते. कॅल्शियम आणि लोहाच्या कमतरतेमुळे तुम्हाला चालता-फिरताना त्रास होऊ शकतो; म्हणूनच डॉक्टरही तुम्हाला या दोन्हीचं संतुलन राखण्याचा सल्ला देतात. आहारात कॅल्शियम आणि लोह यांचं प्रमाण भरपूर असेल, अशा पदार्थांचा समावेश करावा. यात मेथी, पालक, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश आहे. कोबी या भाजीत अँटिऑक्सिडन्ट असतात. व्हिटॅमिन आणि फॉलेट-फायबरही असतं. सॅलडच्या स्वरुपात भाज्यांचा आहारात समावेश करा. कॅल्शियम हाडांमधील महत्त्वाचा घटक आहे. त्याच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होतात. ‘न्यूरो सिस्टम’ चांगलं ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. कॅल्शियमचं प्रमाण कमी झाल्यास शरीरात उपलब्ध असलेलं कॅल्शियम अधिक प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियम कमी होण्यास सुरुवात होते. परिणामी हाडांचं दुखणं सुरू होतं. अनेकदा दुखण्याचं हे दुष्टचक्रच बनतं.

हिमोग्लोबीन हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याचं संतुलन राखणं गरजेचं आहे. हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लाल रक्तपेशी कमी झाल्यानं ही समस्या निर्माण होते. हिमोग्लोबीन कमी असल्यास अशक्तपणा येतो. त्यामुळे संतुलित आहार घेणं सर्वांत गरजेचं आहे. पेरू खाल्ल्यानं हिमोग्लोबीनचं प्रमाण वाढतं. दररोज किमान एक पेरू खाल्लाच पाहिजे. बिटामुळेही हिमोग्लोबीन वाढतं. जेवणात सॅलडचं प्रमाण जास्त ठेवावं. डाळिंब खाल्ल्यानंही हिमोग्लोबीनचं प्रमाण संतुलित राहतं. डाळींबाचा रसही फायद्याचा ठरतो. सफरचंद खाल्ल्यानं अशक्तपणा दूर होतो. तुळशीपत्र खाल्ल्यानं शरीरातील हिमोग्लोबीन संतुलित राहायला मदत होते. मध अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. ते एखाद्या औषधासारखं काम करतं. अॅनिमिया झालेल्या लोकांनी मधातील लोहासाठी त्याचं नियमित सेवन करावं. पालकाची भाजी अशक्तपणा घालवते. त्यामुळे त्याचा आहारात समावेश करावा. यात कॅल्शियम, अ, ई आणि बी ९ जीवसत्त्व आणि बिटा केरॉटिन असतं. अर्धा कप उकळलेल्या पालकात ३.२ मिलिग्रॅम लोह मिळतं.

हाडं आणि स्नायूंमधील दुखण्यासाठी ड जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतं. अलीकडच्या काळात स्नायूंचं दुखणं ही तरुणाईसमोरची मोठी समस्या ठरली आहे. त्याचं कारण म्हणजे ड जीवनसत्त्वाची कमतरता. शहरी भागात राहणारे ८० ते ९० टक्के लोक ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या त्रासांनी ग्रस्त आहेत. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेनं हार्मोनमध्ये कमी निर्माण होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. उन्हाचं प्रमाण कमी मिळालं, तरच ड जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. या जीवनसत्त्वाचा डोस नियमितपणे मिळाला, तर हाडं आणि स्नायूंचं दुखणं कमी होतं.शरीराच्या मजबुती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे जीवनसत्त्व उपयोगी आहे. त्यामुळे त्याचा डोस पुरेशा प्रमाणात घेणं गरजेचं आहे. किडनी, लिव्हर, फुफ्फुसं यांच्यासाठी व या अवयवांचे आजार कमी करण्यासाठी ड जीवनसत्त्वाची भूमिका महत्त्वाची आहे. कर्करोगापासून बचावासाठी ड जीवनसत्त्व उपयुक्त आहे. हाडं ठिसूळ होणं, स्नायूंची दुर्बलता यापासून मुक्तीसाठी ड जीवनसत्त्वाचं प्रमाण संतुलित राखणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, केस गळती, थकवा, सुस्ती, अनियमित मासिक पाळीच्या समस्या ड जीवनसत्त्वामुळे दूर होतात.

Loading...

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here